
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात भीषण अपघात; तुषार भूमकर यांचा मृत्यू
Thank you for reading this post, don't forget to subscribe!मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत पुण्यातील वाकड येथील तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे फॉर्च्युनर कारने पुण्याहून मुंबईकडे जात होते. यावेळी मिसिंग लिंकच्या बोगद्यात त्यांच्या कारने समोर चाललेल्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातात कारमधील इतर ३ ते ४ जण जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस व बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
तुषार भूमकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.







